धुळ्यात मालमत्ता कर विरोधात राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
(खान्देश वार्ता)-धुळे
महापालिकेने धुळेकर नागरिकांना वाढीव घरपट्टी आकारण्याची मोहिम हाती घेतली आहे. वाढीव काराची नोटीस हातात पडल्यानंतर धुळेकरांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. शहरात सोयी सुविधांची अनावस्था असताना मनपा अवाजवी कर आकारते कशी असा संताप्त सवाल धुळेकरांमधून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ईशादभाई जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी धुळे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला. वाढीव घरपट्टी रद्द झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
तसेच मनपाने वाढीव मालमत्ता कराची नोटीस मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान धुळेकरांच्या बाजूने राष्ट्रवादी मैदानात उतरल्याने धुळेकरांमधून इर्शाद जहागीरदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेचे कौतुक होत आहे.
महापालिकेतर्फे शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले जात असून मालमत्ताधारकांना सुधारित वाढीव घरपट्टी आकारले जात आहे. महानगरांपेक्षाही अधिकचा मालमत्ता कर आकारून धुळे महापालिकेने नागरिकांचे कंबरडे मोडण्याचा चंग बांधला आहे. शहरातील अनेक भागात आजही मूलभूत सोयी सुविधा नाहीत. त्यातच महापालिकेकडून नागरिकांच्या हातात वाढीव घरपट्टीचे बिले देण्यात आली आहेत. यामुळे धुळेकरांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. वाढीव घरपट्टी आकारल्यानंतर शहरातील मालमत्ता धारकांकडून शेकडो हजारो हरकती मनपाकडे दाखल होत आहेत. परंतु हा कोणा एका मालमत्ता धारकावरील अन्याय नसून समस्त धुळेकरांवर अन्याय होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इरशादभाई जहागीरदार हे धुळेकरांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सकाळी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, शहराध्यक्ष जयाताई साळुंखे, राजेंद्र चितोडकर, ज्ञानेश्वर माळी, गोपाल देवरे, रवींद्र आघाव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.