(खान्देश वार्ता)-धुळे
नवे पाेलीस अधीक्षक जिल्ह्यात दाखल हाेताच सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. पाेलिसांनाही अधीक्षक धिवरेंमुळे नवी ऊर्जा प्राप्त झाली असून खबऱ्यांचे जाळेही ॲक्टीव झालेले दिसते. कारण आता दारूच्या ट्रका, गुटख्यांचे कंटनेर दिसू लागले असून माेठमाेठ्या कारवाया हाेत आहेत. या कारवायांचे जिल्हाभरातून स्वागत हाेत असून ही धडाडी नव्याचे नऊ दिवस न ठराे, अशी अपेक्षा आहे.
नव्या अधीक्षकांनी अवैध व्यवसायांचा बिमाेड जरूर करावा पण प्राधान्याने जिल्ह्याला लागलेल्या गुटख्याच्या कॅन्सरचे समूळ उच्चाटन करावे. टपरीवर जाऊन छपरी कारवाई न करता शहरातील गुटखा माफियांच्या गाेडावून पर्यंत पाेहचत छापे मारावेत. महामार्गावर काेणकाेणत्या अधिकाऱ्यांच्या यादीतील विशीष्ट गाड्यांना हिरवा झेंडा मिळताेय ते हुडकावे. अनेकदा खबऱ्यांनी गुटख्याच्या गाड्यांबाबत संबंधित पाेलीस ठाण्यांच्या प्रभारींना टीप दिल्या.
मात्र, ही गाडी आमच्या साहेबांच्या यादीतील असल्याचे सांगत खबऱ्यांना धारेवर धरण्यात आले आहे. या अवैध व्यवसायांमध्ये पाेलीस दलातील काही अधिकारी व कर्मचारी काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे भागीदार आहेत का?. मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून गुटखा धुळ्यामार्गे महाराष्ट्रभर जाताे, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे संपूर्ण वाॅश ऑऊट हाेऊन या धंद्याच्या मूळापर्यंत अधीक्षकांनी पाेहचावे.
मुजाेरांचा भाव नवे अधीक्षक उतरवतील का..!
नवीन अधीक्षक धिवरे येणार आणि जुने जाणार याच टप्प्यावर गुटख्याचा अख्खा ट्रक माहिती मिळूनही कारवाई न करता सोडून दिला.तो कोणी सोडला, कोणाच्या इशारावर सुटला याच्या मुळाशी नवे अधीक्षक जातील, अशी धुळेकरांची रास्त अपेक्षा आहे. धुळे शहर व जिल्ह्यातून गुटख्याची तस्करी, हा नवा विषय नाही. मात्र, ट्रकमध्ये गुटखा असल्याबाबत तक्रार करूनही पाेलीस दलाने कारवाई केली नाही, हे विशेष. यामुळे पाेलीस आणी आरटीओंच्या भूमिकांबाबत संशय व्यक्त हाेत आहे. कुठलीही कारवाई न करता हा ट्रक जेथून आला तेथे सुखरूप पाठविण्यात आल्याचे कळते. चेक पोस्टवर आरटीओ अहाेरात्र कर्तव्य बजावत असताना गुटख्याची गाडी पास होते कशी.तर याबाबत तक्रार करूनही पाेलीस का कारवाई करत नाहीत, यातच सर्व गौडबंगाल असल्याचे सांगितले जात आहे.
पूर्वपीठिका :-
एक ट्रक दिल्लीहुन मुंबईकडे महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखूजन्य गुटखा धुळे मार्गाने रविवार, दि.१९ नाेव्हेंबर रोजी जात होता. हा ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरील आझादनगर हद्दीतील हॉटेल मुंबई पंजाब वर थांबला. याठिकाणी ट्रकमधून तंबाखूजन्य पदार्थांचा वास आल्याने याबाबत तात्काळ माहिती तक्रारदाराने फोनवरून पाेलिसांना दिली. तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड याना कळवून पुढील कारवाई हाेईल असे तक्रारदारास सांगण्यात आले. यानंतर पाेलीस पथक घटनास्थळी पाेहचले.
मात्र, संबंधित ट्रक काही वेळात मुंबईकडे न जाता पुन्हा परत आला हाेता त्या दिशेने मार्गस्थ झाला. यामुळे नेमक्या काेणत्या कारणाने, कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. कारवाई न हाेण्यामागे एका राजकीय व्यक्तीचादेखील हात असल्याची चर्चा हाेत आहे. या प्रकरणाच्या मुळाशीही धिवरेंनी जावे. गुटखा तस्करीला पोलीस दल, आरटीओ विभाग व काही राजकारण्यांच्या आर्थिक हितसंबंधांची काळी किनार असल्याचे संपूर्ण जिल्ह्यात बोलले जात आहे. या गुटख्याच्या कॅन्सरचे समूळ उच्चाटन नव्या अधीक्षकांनी करावे अशी रास्त अपेक्षा आहे.