(खान्देश वार्ता)-धुळे
दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत चोरट्यांकडून सुमारे ४ लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमळे दुचाकी चोरट्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील रहिवाशी रवींद्र सुकलाल पारधी यांची दुचाकी दि.२६ नोव्हेंबर रोजी हिसाळे गावाच्या बस स्टँड जवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. यासंदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्ह्यांचा उकल करण्याच्या सूचना दिल्या.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, सागर मालचे याने आपल्या साथीदारांसह दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्याची खात्री करून सागर मालचेसह विजय मालचे, आनंद मोरे, इक्बाल पिंजारी, सर्व (रा वालखेडा ता. शिंदखेडा) आणि अमर पावरा (रा. मेलाने ता.चोपडा) या पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकीसह इतर जिल्ह्यांमधून चोरी केलेल्या एकूण १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील सहा दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले असून सहा गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एकूण ४ लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे दुचाकी चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांनी देखील केलेल्या कामगिरीबद्दल गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, तसेच अमरजीत मोरे, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी, योगेश जगताप, किशोर पाटील, कैलास महाजन, राजू गीते यांनी केली आहे.