(खान्देश वार्ता)-धुळे
शहरातील नकाणे रोडवरील बालाजी नगरमध्ये बुधवारी सायंकाळी निकीता पाटील या तरुणीचा गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ माजलेली असतानाच गुरुवारी सकाळी तरुणीच्या घरापासून काही अंतरावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळ विषाची औषधाची बाटली असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, तरुणीच्या भावाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत ज्या तरुणावर संशय व्यक्त केला तो तरुण फरार असल्याने खुनाचे गुढ वाढले आहे.
दरम्यान, या हत्येमागे प्रेमाचा त्रिकोण असल्याची थेअरी देखील मांडली जात आहे. बुधवार दि२२रोजी सायंकाळच्या सुमारास निकीता कल्याण पाटील (२१) या तरुणीची तिच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने निर्घून हत्या करण्यात आली. घरात ती एकटी असल्याने डाव साधून तिच्या मानेवर कसायासारखे वार करण्यात आले.
यात ती जागीच गतप्राण झाली. घरासमोर राहणार्या व्यक्तिने ही माहिती दिल्यानंतर तिच्या कुटुंबियांना हा प्रकार कळला. प्रेमसंबंधाला नकार दिल्याने आपल्या बहिणीची हत्या झाल्याचे निकीताचा भाऊ अनिकेत कल्याण पाटील याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. महेश मराठे हा बहिणीचा सातत्याने पाठलाग करत होता. प्रेमसंबंधासाठी त्याने तगादा लावलेला होता. त्याला नकार दिल्याने त्याने बहिणीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला होता.
घटनेनंतर महेश मराठे फरार झाल्याने त्याच्यावरील संशय आणखी गडद झाला. परंतु, आज सकाळी खुनाच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर अनिकेत वाल्मिक बोरसे (२६ रा. महाले नगर, मोगलाई, धुळे) याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. निकीता आणि मयत अनिकेत बोरसे यांचा परिचय होता किंवा नाही, या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कारण रात्री निकीताच्या मृतदेहापासून श्वानपथकाने झाडाझुडपांपर्यंत माग काढला.
मात्र, अंधार असल्याने पोलीस तेथेच थांबले. परंतु, आज सकाळी ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला तेथेच श्वान घुटमळला होता. यावरुन निकीताचा मारेकरी म्हणूनही अनिकेतकडे बघितले जात आहे. कारण मयत अनिकेतच्या कपड्यावर रक्ताचे डाग मिळून आल्याचे समजते. हे रक्ताचे डाग निकीताचे असल्याचा संशयही व्यक्त होतोय. शिवाय आत्महत्या करण्यासाठी अनिकेतने निवडलेली जागाही संशयाला जागा करुन देत आहे. पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरु केला आहे. तर निकीताच्या भावाने संशय घेतलेल्या महेश मराठे हा ताब्यात आल्यानंतर सत्य परिस्थिती बाहेर येण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सकाळी अनिकेत बोरसे याचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, देवपूर पोलीस ठाण्याचे सतिष घोटेकर, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या संगिता राऊत, डॉग स्कॉड, फॉरेन्सीक पथकाने घटनास्थळाची पहाणी केली. यावेळी अनिकेतच्या मृतदेहाजवळ मोबाईल, सायकल तसेच विषाची बाटली पोलिसांना आढळून आली. तर काल निकिताच्या खुनानंतर चाकू घटनास्थळीच आढळला होता. त्यामुळे या दोन घटनांचा परस्पर काही संबंध आहे का, या दिशेने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
कोट-
तरुणीच्या खुनानंतर काही अंतरावरच गुरुवारी सकाळी अनिकेत बोरसे या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्याच्याजवळ किटकनाशकाची बाटली देखील आढळली असून त्याने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. त्यामुळे खुन आणि आत्महत्या या दोन्ही घटनांचा काही परस्पर संबंध आहे, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
-किशोर काळे,अपर पोलीस अधिक्षक, धुळे.