(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चार कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली सोमवारी रात्री केली आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून विविध पोलीस दलात निरनिराळ्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान चारही कर्मचारी हे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ खाजगी वाहनधारकांकडून अवैधरित्या वसुली करीत असताना आढळून आले होते. जिल्ह्याचे अधीक्षक धिवरे यांनी चारही कर्मचाऱ्यांवर पोलीस दलात अशोभनीय कृत्य, कसुरी केल्याचा ठपका ठेवून त्यांची तडकाफडकी बदली केली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ सोमवार दि. ८रोजी रात्रीच्या सुमारास सोनगीर व धुळे तालुका पोलीस ठाण्यातील चारही कर्मचारी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांकडून बेकायदेशीरपणे वसुली करीत असल्याचे आढळून आले होते.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या कृत्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांची कर्तव्यात अशोभनीय अशी गंभीर कसुरी करताना मिळून आल्याचे नमूद करीत आदेश काढले आहेत. त्यानुसार सोनगीर पोलीस ठाण्यातील नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे यांची मोटार वाहन परिवहन विभाग, पोलीस शिपाई सिराज सलीम खाटीक पोलीस मुख्यालयात, धुळे तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी दीपक गुलाबराव पाटील पोलीस मुख्यालय धुळे, चालक पोलीस शिपाई वसंत नरहर वाघ यांची मोटार परिवहन विभागात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान महामार्गावरून पोलीस वाहनधारकांकडून वसुली करताना आढळून आल्यास नागरिकांनी संबंधितांचा व्हिडिओ अथवा फोटो काढून जिल्हा पोलीस विभागाला पाठवावा, असे आव्हान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.